राजन तेलींच्या मुलावर प्राणघातक हल्ला, राणेंकडे संशयाची सुई
भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप तेलींनी केलाय.
मुंबई : भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या मुलावर दादर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप तेलींनी केलाय.
दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर पाचवर कणकवलीला जाणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या ए-1 बोगीत ही धक्कादायक घटना घडलीय.
प्रथमेश तेली रेल्वेत चढत असताना दोन हल्लेखोरांनी त्यांना खाली खेचून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी प्रथमेश यांना चालत्या रेल्वेखाली ढकलण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आरडाओरडा केल्यामुळं सुदैवानं घटनास्थळी गर्दी जमली आणि त्यांची सुटका झाली.
मात्र, या मारहाणीत प्रथमेशचा हात जायबंदी झालाय. दोन हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय तर दुसरा आरोपी फरार झालाय.
अटकेत असलेल्या आरोपीचं नाव प्रवीण खरात असून तो चेंबूरचा रहिवासी आहे. मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या आणि राजन तेलींचा व्यवसाय सांभाळणाऱ्या प्रथमेशवरील या प्राणघातक हल्ल्यांमुळं सिंधुदुर्गात खळबळ माजलीय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.