मुंबई :  शाकाहारासाठी बाबा रामदेव देशभरात क्विक सर्व्हिस रेस्तराँ QSR सुरू करण्याची तयारी करत आहेत. एफएमसीजी सेक्टरमध्ये पतंजलीच्या उत्पादनांनी भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर रामदेव बाबा आता केएफसी आणि मॅकडॉनल्डससारख्या दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फास्ट फूड चेनला टक्कर देण्याची तयारी करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रेस्तराँमधून ४०० हून अधिक रेसिपी मिळतील. त्याचबरोबर पतंजलीची जिन्स आणि क्रीडा पोषाख आणि साहित्य बनवण्याची योजनाही आहे.


भारतीयांना शाकाहरी भोजनापेक्षा स्वादिष्ट आणि हितकारक काही असूच शकत नाही, म्हणून आम्ही लोकांना पर्याय देत आहोत. आम्ही आमच्या मेन्यूची उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय अशी विभागणी करणार नाही. जेव्हा आम्ही आमची रेसिपी लोकांमध्ये घेऊन जाऊ, तेव्हा या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या लोकांना चिकन आणि मटन खाऊ घालत आहेत. त्यांना आमच्याशी स्पर्धा करणे कठीण जाईल, अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली आहे.


देशात ६५ ते ७५ टक्के विकले जाणारे फास्ट फूड हे शाकाहारी आहे. यामध्ये पिझ्झा आणि बर्गरचाही समावेश आहे. शाकाहाराकडे लोकांचा वाढलेला कल यामुळे देशात क्विक सर्व्हिस रेस्तराँनी आपल्या मेन्यूमध्ये शाकाहारीचा समावेश केला आहे. आपला आंतरराष्ट्रीय बाजारातही रेस्तराँ सुरू करण्याचा विचार असल्याचे रामदेव बाबा यांनी या वेळी सांगितले. 


मी अनेक देशांचा दौरा केलेला आहे. तिथे लोकांचा शाकाहाराकडे कल वाढत आहे. शाकाहारी पदार्थ खाण्यासाठी लोक रांगेत उभे राहण्यासही तयार असतात, असे रामदेव बाबा यांनी सांगितले.


जिन्स आणि क्रीडा साहित्य तसेच पोषाख बनवण्याच्या क्षेत्रात उतरून नायके, आदिदास सारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करण्याची पतंजलीची योजना आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात उतरण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे. पतंजलीने २०१६-१७ मध्ये १०,५६१ कोटी रूपयांची उलाढाल केली आहे. प्रत्येक क्षेत्रात कंपनीने मोठी प्रगती केली आहे.