देशातील १० लाख बँक कर्मचारी २८ फेब्रुवारी रोजी संपावर
देशभरातील खासगी, परदेशी आणि राष्ट्रीयकृत बँकातील सुमारे १० लाख कर्मचारी तसंच अधिकारी यांचा संपात समावेश असणार आहे.
मुंबई : देशातील १० लाख बँक कर्मचारी २८ फेब्रुवारी रोजी संपावर जाणार आहेत, देशभरातील खासगी, परदेशी आणि राष्ट्रीयकृत बँकातील सुमारे १० लाख कर्मचारी तसंच अधिकारी यांचा संपात समावेश असणार आहे. हा संप २८ फेब्रुवारी रोजी असेल, हा संप एक दिवसाचा असणार आहे. दिल्लीतील युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बैठकीत हा निर्णय झाला.
कामगार कायद्यात होणारे बदल, बँकांसमोरील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसंच नोटाबंदीच्या काळातील मोबदला द्या, यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. देशातील ९ बँक युनियन या राष्ट्रव्यापी संपात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधानांकडून नोटाबंदीनंतर बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. मात्र २ महिन्यात कर्मचाऱ्यांना त्याचा कोणताही मोबदला मिळालेला नाही.५०० आणि २ हजार रुपयांच्या बनावट नोटा तपासणाऱ्या मशिन अद्याप एकाही बँक शाखेत पुरवलेल्या नाहीत तसेच बाजारात २ हजार रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला आहे.कायम स्वरुपी कामासाठी कंत्राटी पद्धतीने मोठ्या प्रमाणात भरती केली जात आहे.