मुंबई : मुंबईत महापौर पदावरून सुरू असलेल्या रणसंग्रामातून भाजपने चतुर खेळी खेळलीय. पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही प्रकारची तडजोड करून आम्हाला महापौर पदाच्या शर्यतीत उतारायचं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्याचबरोबर उपमहापौर आणि कोणत्याही समितीची निवडणूक लढणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच विरोधी पक्षात बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या मदत होणार आहे. भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


भाजपने आपला उमेदवार दिला असता तर अखिल भारतीय सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अधिक महत्व आले असते. त्यापूर्वीच अपक्ष नगरसवेकांना शिवसेनेने गळाला लावले होते. तर भाजपने अभासेच्या गीता गवळी यांना आपल्याकडे वळविले. त्यामुळे मनसेचे महत्व अधिक वाढले. त्यातच मनसेने आपल्याला गृहीत धरु नका, आम्ही मराठी उमेदवार या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला अधिक महत्व आले होते. त्यामुळे महापौर निवडणुकीत काय होणार, याची उत्सुकता शनिवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत कायम होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीतील हवाच काढून टाकली. त्यामुळे मनसेचेही महत्व कमी झाले. तर गीता गवळी यांचे 'ना घर का ना घाटका', अशी अवस्था झाली आहे.