`मनसेच्या इंजिनाला भाजपचं इंधन`
पाकिस्तानी कलाकार असलेल्या ए दिल है मुश्कील चित्रपटावर सुरु असलेलं आंदोलन मनसेनं मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
मुंबई : पाकिस्तानी कलाकार असलेल्या ए दिल है मुश्कील चित्रपटावर सुरु असलेलं आंदोलन मनसेनं मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सैन्य कल्याणनिधीत प्रत्येकी पाच करोड रुपये जमा करण्यावर समझौता केला. राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे शहीद जवानांचा अपमान केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी राज ठाकरे व करण जोहर यांची बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी समझौता करण्याचे काम केले. खरं तर मुख्यमंत्र्यांचे राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे हे काम आहे, सेटलमेंट घडवून आणणे हा त्यांचा विषय नाही, पण मुख्यमंत्र्यांनी सेंटलमेंट करण्याचा नवा पायंडा या राज्यात सुरु केल्याचंही मलिक म्हणाले
राज ठाकरेंचा आजवरचा इतिहास पाहता ते आपली भूमिका सातत्याने बदलताना दिसतात. हाती घेतलेला कोणताही मुद्दा पुर्ण न करता तो अर्ध्यावर सोडणे किंवा सेंटलमेंट करणे अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील मनसेच्या इंजिनाला ,भाजपकडून इंधन पुरवलं जाते हे आता उघड झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत देखील बीजेपी जिंकवायचे आणि शिवसेनेला हरवायचे ही मनसेची भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज ठाकरे यांचे नियंत्रण करतात. जेव्हा वाटेल तेव्हा हे इंजिन सुरु करतात आणि बंद करतात त्यामुळे भाजपा आणि मनसे या दोन्ही पक्षांचं साटेलोटं असल्याचा घणाघात नवाब मलिक यांनी केला आहे.