शिवस्मारकाचे श्रेय घेण्यासाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ, विनायक मेटे नाराज
अरबी समुद्रात शिवस्मारक उभारल्या जातय ही भाजपची वचनपूर्ती असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. तर शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिलेय.
मुंबई : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारल्या जातय ही भाजपची वचनपूर्ती असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. त्यासाठी भाजपने मुंबईसह राज्यभर भाजपने कार्यक्रमांचं आयोजन केले आहे. भाजपला शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिलेय. 'शिवस्मारक व्हावे हीच शिवसेनाप्रमुखांची इच्छा' असं प्रत्युत्तर शिवसेनेने दिलं आहे.
शिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाआधी रुसवेफुगवे समोर येऊ लागलेत. या कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबईसह राज्यभर भाजपने कार्यक्रमांचं आयोजन केले आहे. श्रेयवादात भाजपने शिवसेनेलाही मागे टाकले आहे. दरम्यान, भाजपला प्रत्युत्तर देणारे हे पोस्टरच शिवसेनेने रातोरात मुंबईत लावल्याने या दोन्ही पक्षांमध्ये स्मारकाच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
दरम्यान, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनाही भाजपने डावलले गेले आहे. मेटेंना डावलून स्मारकाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांची उपस्थिती होती. इतकंच नाही तर जलपूजन कार्यक्रमातही मेटेंना स्थान देण्यात आलेले नाही. आजच्या भाजपच्या चेंबूरमधील रॅलीतला उपस्थित न राहता विनायक मेटे थेट निघून गेले.
मेटे यांच्यावर केवळ बीकेसी इथल्या कार्यक्रमात आभार प्रदर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे विनायक मेटे नाराज असल्याची चर्चा आहे..दुसरीकडे शिवसेनाही भाजपच्या श्रेय घेण्यामुळे नाराज असल्याचे बोललं जाते आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली. थोड्याच वेळात मातोश्रीवर ही बैठक होत आहे.
शिवस्मारक भूमीपूजन कार्यक्रमा संदर्भात ही बैठक असल्याचे समजते आहे. या भूमीपूजन सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना देण्यात आलंय. त्यामुळेच या कार्यक्रमाला जायचे की नाही याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.