मुंबई : एकनाथ खडसे यांना आधी क्लिन चिट द्यायची नंतर त्यांच्या राजीनामा घ्यायचा हा प्रकार समजत नाही. जर क्लिन चिट द्यायची होती मग राजीनामा कशाला घेतला, असा सवाल विधानपरिषद सदस्य आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप जाणीवपूर्वक बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे, असा गंभीर आरोप राणे यांनी केलाय. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर राणे यांनी हे वक्तव्य केले.


एका बाजूला देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसमोर खडसेंना क्लीन चिट देतात आणि दुसरीकडे पक्षाकडे खडसे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आग्रह धरतात. खडसे यांच्यासारख्या नेत्याचे इतके धिंडवडे काढण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता, असेही राणे यांनी सांगितले. 


एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप निश्चितपणे गंभीर आहेत आणि त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र, खडसे भाजपमधील आणि बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांत खडसेंच्या इभ्रतीचे ज्याप्रकारे धिंडवडे काढण्यात आले, त्यावरून भाजप बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे, असे दिसत असल्याचे राणेंनी म्हटले.