नारायण राणेंच्या विरोधात भाजपकडून हक्कभंग
नारायण राणे यांच्या विरुद्ध आज सत्ताधारी भाजपने हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध आज सत्ताधारी भाजपने हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात संघर्ष पेटण्याचे चिन्हे आहेत.
राणे यांनी कोपर्डी बलात्कारप्रकरणी विधान परिषदेत बोलताना मंत्रालयात देखील महिला अधिकारी सुरक्षित नाहीत. एका कॅबिनेट मंत्र्याने एका क्लासवन महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. त्या महिलेने वरिष्ठ मंत्र्याकडे तक्रार केल्याचा सनसनाटी आरोप केला. यावरून सरकारमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. तसेच भाजप गुंडाचा पक्ष असल्याचे म्हटले होते. राज्यात तीन मुख्यमंत्री असल्याची टीका राणे यांनी केली होती. याविरोधात भाजपने आक्षेप घेत हक्कभंग दाखल केलाय.
राणे यांनी संपूर्ण महिला अधिकाऱ्यांचा अवमान केल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या बेफाम आरोपाबाबत राणे यांनी उद्या माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला होता. मात्र, राणे हे आपल्या विधानावर ठाम राहिलेत. आज अखेर भाजपने त्यांच्याविरोधात विधान परिषदेच्या सभापतींकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.