मुंबईच्या महापौरपदासाठी तीन पॉवर सेंटर्स राज्याचे लक्ष
देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये... सध्या कुणीच आपले पत्ते उघड करत नाहीये. शिवसेनेचा सूर मवाळ झाला असला आणि भाजपानंही युतीसाठी पाऊलं टाकल्याचं दिसत असलं, तरी अद्याप सगळंच अधांतरीत आहे. नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक मुख्यालयात आले, तेव्हा याचाच प्रत्यय आला...
मुंबई : देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये... सध्या कुणीच आपले पत्ते उघड करत नाहीये. शिवसेनेचा सूर मवाळ झाला असला आणि भाजपानंही युतीसाठी पाऊलं टाकल्याचं दिसत असलं, तरी अद्याप सगळंच अधांतरीत आहे. नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक मुख्यालयात आले, तेव्हा याचाच प्रत्यय आला...
तब्बल 82 जागा जिंकणाऱ्या भाजपाचे नगरसेवक महापालिकेत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा उत्साह होता. त्याच वेळी मुंबई महापालिकेतल्या सत्ता समीकरणांची उत्सुकताही दिसत होती. शिवसेनेसोबत पुन्हा युती होणार का, महापौर-स्थायी समीतीमध्ये स्थान मिळणार का की विरोधी पक्षात बसावं लागणार, या सर्वसामान्यांच्या मनातल्या शंका भाजपा नगरसेवकांच्या चेहऱ्यावरही दिसत होत्या. कारण हा सगळा निर्णय मातोश्री आणि वर्षा या दोन बंगल्यांमध्येच होणार असल्यामुळे त्याची गंधवार्ता या नगरसेवकांना असायचं कारण नाही... ज्येष्ठ नगरसेवक मनोज कोटकही याबाबत अनभिज्ञ दिसतात...
सत्ता स्थापननेबद्दल भाजपची भूमीका लवकरच कळेल, असं मनोज कोटक यांनी म्हटलंय. दोन ते तीन दिवसात कोकण भवनात जावून गट स्थापन करण्याची शक्यताही वर्तवण्यता येत आहे.
मुंबईच्या भाजपाच्या विजयाचे शिल्पकार आशिष शेलार याआधी भाजपाचाच महापौर होईल, असं ठामपणे सांगत होते... काही कामानिमित्त शेलार महापालिकेत दिसले खरे, पण सत्ता समीकरणांबाबत दावा करण्याचं टाळून पत्रकारांना हात जोडून निघून गेले...
एकीकडे शिवसेना-भाजपामध्ये छुपी बोलणी सुरू असल्याची चर्चा रंगली असताना भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मातोश्रीवर पोहोचले... उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ही भेट झाली असली तरी आमंत्रणाच्या टायमिंगमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्याच...
दुसरीकडे पुण्यात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपलं कुळ आणि मूळ शिवसेना असल्याचं सांगत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल, असं म्हटलंय.
एका अर्थी मनसे शिवसेनेसोबत जाण्याच्या मानसिकतेत असल्याचं नांदगावकरांच्या विधानामुळे दिसत असलं, तरी याचा निर्णय राज ठाकरेच घेतील... त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सत्तेचं समीकरण सोडवण्यासाठी मातोश्री, वर्षा आणि कृष्णकुंज या मुंबईतल्या तीन पॉवर सेंटर्सकडे राज्याचं लक्ष लागलंय... अर्थात, फोर्टच्या काँग्रेस मुख्यालयात काय शिजतंय, हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे...