मुंबई : पत्रकारिता व जाहिरात माध्यमात गेली दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असणारे योगेश पावले यांच्या 'मनातले काही, काही म्यानातले' या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतंच करण्यात आलं. राजहंस प्रकाशनची निर्मिती असलेला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार व झी २४ तासचे मुख्यसंपादक डॉ.उदय निरगुडकर यांच्या हस्ते करण्यात आले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हळुवार नात्यांपासून इंटरनेटवरील प्रेमापर्यंत, ढोंगी राजकारण्यांपासून पर्यावरण प्रदूषणापर्यंत टोकदार, नर्मविनोदी भाष्य करणारा तसेच संस्कृतीचे हरवू पाहणारे दुवे शोधणारा, पर्यावरण समाज संस्कृतीचा जागर करणारा, बदलत्या मानवी जीवनाचा मागोवा घेणारा योगेश पावले यांचा हा काव्यसंग्रह आहे. 


या वेळी बोलताना डॉ . निरगुडकर म्हणाले की नात्यांमधले अलवार बंध उलगडतानाच जीवनातील सुख-दु:खांकडे अलिप्ततेने व उत्कटतेने एकाच वेळी पाहण्याचे सामर्थ्य त्यांना लाभले आहे.


त्याच बरोबर समाजातील प्रथा परंपरा रूढी यावर भाष्य करताना त्यांची कविता अधिक विखारी होते , लोकशाहीमधील वाईट गोष्टी मग त्या आचारसंहिता भंग , खोटी आश्वासने ,निवडणुका ,त्यातील मतदारांना गृहीत धरणे असो , यावर त्यांची लेखणी म्यानातील तलवारीप्रमाणे प्रहार करते. 


आजच्या  होर्डिंगबाज नेत्यांची निर्भस्तना करताना त्यांनी पोशिंदा याऐवजी 'शोषिंदा ' हा नवीन शब्द मराठीला बहाल केला आहे. तसंच  शेतकऱ्यांच्या कालसुसंगत व्यथा मांडतानाच  आज महानगरात राहताना सर्वसामान्य माणसाला ज्या नरकयातना भोगाव्या लागतात , त्यासुद्धा त्यांनी समर्थपणे मांडल्या आहेत, असे डॉ. उदय निरगुडकर यांनी सांगितले. 


'मनातले काही, काही म्यानातले'चा प्रकाशन सोहळा