`राम मंदिर उभारून श्रेय घ्या`
जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये.
मुंबई : जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे.
'मंदिर वही बनायेंगे' ते करून दाखवा आणि त्याचं श्रेय घ्या, रेल्वे स्टेशनला राम मंदिर नाव दिल्याचं कसलं श्रेय घेता, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.
गुरुवारी झालेल्या या उदघाटन सोहळ्यात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी रंगली. पंतप्रधान मोदी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणाबाजीने काही काळ गोंधळ माजला होता. यावर संतप्त होऊन दिवाकर रावते यांनी मोदी हे रामापेक्षा मोठे आहेत का असे विचारत भाषण अर्धवट सोडून दिले तर याच गोंधळामुळे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही आपल भाषण दोन मिनिटात आटोपते घेतले.