मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. बुधवारी झालेल्या प्रचंड गोंधळानंतर आणि मनःस्तापानंतर आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू झालीय. बुधवारी संध्याकाळी मध्य रेल्वेवर दुहेरी संकट आलं.
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. बुधवारी झालेल्या प्रचंड गोंधळानंतर आणि मनःस्तापानंतर आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू झालीय. बुधवारी संध्याकाळी मध्य रेल्वेवर दुहेरी संकट आलं.
संध्याकाळी सायनजवळ लोकलचा पेंटाग्राफ तुटला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ते दुरूस्त होऊन गाड्या सुरू होतात तोच विक्रोळीजवळ ओव्हर हेड वायर तुटली. त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
परेल ते डोंबिवली या रोजच्या 1 ते सव्वा तासाच्या प्रवासाला या दुहेरी गोंधळामुळे जवळपास चार तास लागले. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या गोंधळात लोकल ट्रेनमधले पंखे आणि दिवे मध्येच बंद होत होते, त्यामुळे प्रवाश्यांच्या मनस्तापात आणखीनच भर पडली.
हा सगळा गोंधळ निस्तरण्यासाठी मध्य रेल्वेला पाच तास लागले, वाहतूक सुरू झाली मात्र सुरळीत होण्यासाठी गुरुवारची सकाळ उजाडावी लागली. त्यातही अनेक लोकल्स रद्द करण्यात आल्याने प्रवासी काहीसे नाराज आहेत.
अजून पावसाळा सुरू व्हायचाय त्याच्या आधीच हा महागोंधळ प्रवाशांनी पाहिला आणि पावसाळ्यात काय होणार या कल्पनेन प्रवाशांची चिंता आणखी वाढली...दोन्ही ठिकाणचे तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आले आहेत. वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू झाली आहे.