मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉडरिंग प्रकरणात ईडीच्या अधिकार्‍यांनी भुजबळ कुटुंबीयांभोवतीचा फास घट्ट करण्यास सुरुवात केलेय. त्यांच्या ५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेय. हा भुजबळांना मोठा धक्का आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ तुरुंगात असतानाच ईडीच्या अधिकार्‍यांनी त्यांची नाशिक जिल्ह्यातील ५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करताना गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन ईडीने ताब्यात घेतली आहे.


मनी लॉण्डरिंग कायद्याखाली ईडीच्या अधिकार्‍यांनी भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जप्तीची नोटीस बजावली आहे. या कंपनीने २०१० साली लिलावामध्ये गिरणा साखर कारखाना आणि २९० एकरचा भूखंड खरेदी केला होता.


महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर घोटाळ्यातून मिळालेल्या काळ्या पैशातून उपमुख्यमंत्री पदी असताना भुजबळ यांनी ही मालमत्ता लिलावात बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याचे ईडीच्या तपासातून पुढे आलेय. मालमत्ता जप्तीची ही चौथी नोटीस असून याआधी भुजबळ कुटुंबीयांची सुमारे २८० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केलेय.


दरम्यान, समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर छगन भुजबळ ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असून समीर याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी अशी मागणी ‘ईडी’तर्फे करण्यात आली होती. 


गेल्या दीड महिन्यापासून आर्थर रोड तुरुंगात असलेल्या समीर भुजबळ याने काल माझगाव येथील वडापाव आणि चटणी-सॅण्डवीचवर ताव मारला. समीरला आज न्यायालयात हजर करणार हे माहीत असल्याने त्याच्या मित्रांनी खास माझगाव येथून वडापाव आणि चटणी-सॅण्डवीच आणले होते.