मुख्यमंत्र्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकणार
मुंबई-नागपूर एक्सप्रेस कॉरिडॉर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन मधील MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकून त्यातून मिळणाऱ्या निधीतून हे काम होणार आहे.
मुंबई : मुंबई-नागपूर एक्सप्रेस कॉरिडॉर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन मधील MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकून त्यातून मिळणाऱ्या निधीतून हे काम होणार आहे.
शिवसेना आणि मनसे या दोन्ही राजकीय पक्षांनी या प्रकल्पासाठी मुंबईतील भूखंड विकण्यास आक्षेप घेतला आहे. दरम्यान, याबाबत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी याविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून आपले मत मांडलेय. भूखंडातील काही जागा सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांसाठी क्रीडांगण म्हणून राखीव ठेवावी. नक्कीच यातून मुंबईचे आणि या कॉरिडॉरचे भले होईल, असे खोचक विधान ठाकरे यांनी केले आहे.
मनसेने या प्रकल्पासाठी मुंबईतील एक इंचही जागा विकू देणार नाही, असा इशारा दिला आहे. या प्रकल्पाला विरोध नाही मात्र तो मुंबईतील मोकळ्या जागांच्या मोबदल्यात नको. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य करावे किंवा राज्य सरकारने ईक्विटी बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारावा त्याला केंद्र सरकारने हमी द्यावी, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.