काँग्रेसची पहिली यादी : संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप
मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप देण्यात आले आहे.
मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आला असतानाच मंगळवारी संध्याकाळी मुंबई काँग्रेसने ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप देण्यात आले आहे.
काँग्रेसने विरोधी पक्षनेत्यासह १९ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये ९६ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी खासदार गुरुदास कामत यांच्यातील वाद उफाळून आला होता. या वादामुळे काँग्रेसमधून ७ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.
दरम्यान, भाजपच्या उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय. तर भामरा का काँग्रेसमध्ये गेले याचा गौप्यस्फोट दोन तारखेला करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सिटीझन्स कॉर्पोरेटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मकरंद नार्वेकरांनी भाजपत प्रवेश केला. मकरंद नार्वेकर हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या राहुल नार्वेकरांचे बंधू आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याध्यक्ष आसिफ भामला यांनीही भाजपात प्रवेश केला.