काँग्रेस आमदार नितेश राणे विधीमंडळात आक्रमक
माहितीचा अधिकार यांसारखे प्रभावी कायदे लोकांसाठी असतानाही राज्यातल काही मुजोर अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे अधिकारी लोकप्रतिनिधी किंवा आमदारांपासूनही माहिती लपवत आहेत. पोलीस विभागाने संरक्षण दिलेल्या ३२० लोकांची माहिती मिळवण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. मात्र दोन वेळा अर्ज करूनही पोलीस उपायुक्त (सुरक्षा) सुप्रिया यादव यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी नितेश राणे यांच्या अर्जाची साधी दखलही घेतली नाही. याबीबतची माहिती राणे यांनी बुधवारी विधानसभेत सादर केली.
मुंबई : माहितीचा अधिकार यांसारखे प्रभावी कायदे लोकांसाठी असतानाही राज्यातल काही मुजोर अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे अधिकारी लोकप्रतिनिधी किंवा आमदारांपासूनही माहिती लपवत आहेत. पोलीस विभागाने संरक्षण दिलेल्या ३२० लोकांची माहिती मिळवण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. मात्र दोन वेळा अर्ज करूनही पोलीस उपायुक्त (सुरक्षा) सुप्रिया यादव यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी नितेश राणे यांच्या अर्जाची साधी दखलही घेतली नाही. याबीबतची माहिती राणे यांनी बुधवारी विधानसभेत सादर केली.
माहिती देण्यास टाळाटाळ करणा-या अशा अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी यावेळी केली. मात्र मुद्दा मांडण्याची ही वेळ नसल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याविषयी निर्णय देण्यास नकार दिला. विरोधकांनी बागडे यांना चांगलेच धारेवर धरल्यानंतर कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. अखेर सभागृह संपेपर्यंत मुख्यमंत्री निवेदन सादर करतील, असा निर्णय बागडे यांनी दिल्यानंतर सभागृह शांत झाले. मात्र याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लक्षवेधी सूचना मांडताना नितेश राणे यांनी ३२० जणांना विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असून आमदार या नात्याने मी याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त (सुरक्षा) सुप्रिया यादव यांच्याकडे मागितली होती. ६ फेब्रुवारी २०१६ आणि ११ एप्रिल २०१६ रोजी दोन वेळा अर्ज करूनही यादव यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. नितेश राणे यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. मात्र हा मुद्दा मांडण्याची ही योग्य वेळ नसल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांंनी सांगताच विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. विरोधकांसह सत्ताधार्यांनीही नितेश राणे यांचा हा मुद्दा उचलून धरला. संपूर्ण सभागृहात गोंधळ उडाल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे आणि या मुजोर अधिकार्यांना धडा शिकवावा, अशी मागणी उचलून धरली. नितेश राणे यांच्या मुद्द्याला दाद देत विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक झाल्याने कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात अाले. अखेर मुख्यमंत्री आज सभागृह संपेपर्यंत निवेदन करतील, असा निर्णय बागडे यांनी दिला.
कामकाज संपण्याआधी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी निवेदन केले. नितेश राणे यांनी मांडलेल्या मुद्द्याच्या आधारे, त्यांच्या अर्जाला उत्तर देण्यास विलंब का झाला, याबाबत पोलीस आयुक्त, मुंबई यांच्याकडून शहानिशा करून याबाबतचा अहवाल सभागृहात मांडण्यात येईल. अधिवेशन संपण्याआधी हा अहवाल मांडण्यात येईल, असेही बापट यांनी सांगितले