मुंबई :  उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले तसाच निर्णय महाराष्ट्रात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी शिवसेनेने मागणी केल्यानंतर आता त्यांची री काँग्रेसने ओढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नावर राज्य सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारेवर धरणार असल्याचे सुतोवाच विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. 


सोमवारी दुपारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलत होते. 


यापूर्वी शिवसेनेने महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना या संदर्भातील निवेदन दिले होते. यावेळी या शिष्टमंडळात शिवसेनेचे मंत्री सामील होते. त्यावेळी दिवाकर रावते यांनी आपला राजीनामा देखील काढून दाखविला होता. 


त्यामुळे आता सरकारला अडचणीत आणण्यासाठी आणि शिवसेनेला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. या मुद्यावरून सरकारला अस्थिर करण्याची रणनिती काँग्रेसने आखल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 


काँग्रेस- शिवसेनेची विचारात एकमत...


या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेचे एकमत झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आगामी महापौर निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो असे अप्रत्यक्ष संकेत काँग्रेसने दिले आहे.