काँग्रेस करणार परतफेड, मुंबईत शिवसेनेचा महापौर?
मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर असेल असे स्पष्ट केले आहे.
मुंबई : महापालिकेत कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर असेल असे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे भाजपने आपलाच महापौर बसण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहे. याचा एक प्रत्यय उल्हासनगर पालिकेत दिसून आला. आता मुंबईत भाजपचा महापौर बसविण्यासाठी दिल्लीतून फोन आल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने फिल्डींग लावण्यास सुरुवात केलेय. असे असताना काँग्रेस शिवसेनेला हात देऊ शकते. 1978ची परतफेड करण्याची काँग्रेसला संधी आहे.
मुंबई पालिकेत आता शिवसेना 88 तर भाजप 82 अशी नगरसेवक संख्या झाली आहे. मात्र, जोर बैठकांवरच दिसून येत आहे. काल भाजपची कोअर कमिटी बैठक झाली. मात्र, त्यात काहीही निष्पन झालेले नाही. आज पुन्हा भाजपची बैठक होत आहे. तर शिवसेनेचीही दुपारी बैठक होत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी युतीसाठी उत्सुक आहेत. निवडणूक प्रचारात झाले ते झाले. झाले गेले विसरुन जावे, असे म्हणून युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र, शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आजच्या बैठकीत युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज नक्की काय होणार याची उत्सुकता आहे.
1978 मध्ये मुंबई महापालिकेत काँग्रेसचा महापौर होण्यासाठी शिवसेनेने मदत केली होती. त्यावेळी मुरली देवरा महापौर झालेत. त्याबदल्यात शिवसेनेचे वामनराव महाडिक यांना निवडणुकीत मदत करण्याचे ठरले. त्यानुसार काँग्रेसने मदत केली. आता हीच संधी शिवसेनेसाठी आहे. त्यामुळे काँग्रेस महापौर पदासाठी शिवसेनेला मदत करु शकते, अशी अटकळ आहे.
काँग्रेस नेते नारायण राणे, संजय निरुपम यांनीही शिवसेनेला मदत करण्यासाठी विरोध केलेला नाही. तर प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुगली टाकली आहे. शिवसेनेने युती तोडावी, मग विचार करु असे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून शिवसेनेला मदत होणार असेच दिसत आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. जर राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडले तर सरकार अस्थिर होईल, ही भिती भाजपच्या नेत्यांना आहे. तर काँग्रेसला हेच हवे आहे. निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मध्यावधी निवडणुकीसाठी आम्ही तयार असल्याचे भाष्य केले होते. त्यामुळे भाजपने जर महापौरावर दावा केला तर राज्य सरकारचे काही खरे नाही, असेच दिसत आहे. त्यामुळे भाजप नेते जरा दमाने घेतानाचे चित्र दिसत आहे.
जर सरकार अस्थिर झाले तर ते भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे जेवढे जमवून घेता येईल तेवढे शिवसेनेशी जमवून घेतले जाईल, अशी शक्यता आहे. पाच वर्षे सत्तेत राहणे भाजपला महत्वाचे आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेला दुखवून चालणार नाही, हेच सध्याच्या राजकीय स्थितीवरून दिसून येत आहे.