मुंबई :  दाऊदची प्रकृती ठणठणीत असल्याचं, दाऊदा साथीदार छोटा शकीलने म्हटले आहे. दाऊदला गँगरीन झाल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं शकीलने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील 1993 मधील बॉम्बस्फोटामागील प्रमुख सूत्रधार, भारताचा हवा असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गंभीर आजारी असून त्याच्या पायाला गॅंगरीन झाल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर, त्याचा प्रमुख साथीदार छोटा शकीलने या गोष्टीत तथ्य नसल्याचं तसेच दाऊद ठणठणीत असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. 


दाऊदला गॅंगरीन झाला असून त्याचा संसर्ग संपूर्ण शरीरात पसरण्याचा धोका असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी दिले होते. 'दाऊदच्या पायाचा बराचसा भाग सडला आहे. हा आजार बरे होण्याची शक्‍यता फार कमी आहे. त्यामुळे पाय कापण्याशिवाय गत्यंतर नाही', असे दाऊदवर उपचार करत असलेल्या डॉक्‍टरांचं म्हणणं असल्याची बातमी एका न्यूज चॅनेलने दिली आहे. मात्र या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे छोटा शकीलने म्हटले आहे. 


'ही माहिती चुकीची आहे. दाऊदचे वृत्त ही केवळ अफवा आहे, 'भाई' ठणठणीत आहे. डी कंपनीचा कारभार संपविण्यासाठी अशी अफवा पसरविण्यात आली', अशी माहिती छोटा शकीलने दिली.


दाऊदने वयाची साठी गाठली असून १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद मुख्य आरोपी आहे. दहशतवादाशी संबंध असल्याने अमेरिकेने २००३ साली दाऊद हा जागतिक दहशतवादी असे म्हटले होते. दाऊदने टायगर मेमन, याकूब मेमन व अन्य साथीदारांच्या मदतीने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. 


या स्फोटांमध्ये जण २५७ ठार तर ७०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. गेल्यावर्षी या प्रकरणातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली.