मुंबई : गर्दीचा फायदा घेवून लोकांना लुटण्याचे प्रकार तसे नवीन नाहीत , पण आता मुंबईत एक दे धक्का गॅंग सक्रीय झाली आहे.मुंबईतल्या प्रसिद्ध मनीष मार्केटमधील हे सीसीटिव्ही फुटेज, नीट पाहा यात एक काळा शर्ट घातलेला मुलगा गर्दीतून चालत येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक काही तरी घडतं आणि रस्त्यावरील माणसं सैरावैरा पळू लागतात. याच गर्दीतला हा काळा शर्ट घातलेल्या मुलगा उलट्या दिशेने पळू लागतो, त्याला काहीच कळत नाही काय झालं ते आणि बघता बघता त्याच्या हातातील दोन लाख रुपये असलेली बॅग चोरीला जाते.


सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू विशेष करुन मोबाईल एक्सेसरीज या मनीष मार्केटमध्ये मिळतात. तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इतर मार्केटमध्येही पुरवल्या जातात. त्यामुळे या मार्केटमध्ये रोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे या मार्केटमध्ये नेहमी गर्दी असते. याचाच फायदा घेवून ही दे धक्का गॅंग लोकांना लाखो रुपयांचा चुना लावतेय.


मुंबईत विविध ठिकाणी या दे धक्का गॅंगने कारनामे केल्याचं समोर आलय. त्य़ामुळं मुंबई पोलीस या दे धक्का गॅंगचा शोध घेतायेत.


यापूर्वी देखील दे धक्का गॅंगच्या अशा प्रकारच्या चोरीचे प्रकार समोर आलेत. पण मनीष मार्केट मध्ये लागलेल्या सिसिटिव्ही कॅमे-यांमुळे दे धक्का गॅंग कशा प्रकारे हात चलाखीनं लोकांना लुटतात जगासमोर आलं. त्यामुळं मुंबईकरांनो मौल्यवान वस्तू घेऊन फिरत असताना काळजी घ्या.