`शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही`
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली असतानाच भाजप आमदार प्रशांत बंब यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली असतानाच भाजप आमदार प्रशांत बंब यांनी वेगळीच मागणी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची गरज नसल्याचं प्रशांत बंब विधानसभेत म्हणाले. कर्जमाफी ऐवजी शेतकऱ्यांच्या अकाऊंटला पैसे द्या असं बंब म्हणाले. प्रशांत बंब यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला.
शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी बंब यांच्या या वक्तव्यानंतर गोंधळ घालायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.
योगी आदित्यनाथांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत दिलेल्या कर्जमाफीमुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलित मिळालंय. एकीकडे विधीमंडळाचं कामकाज सुरू झालं असतानाच विरोधी पक्ष विधानभवनाच्या समोरच्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते.
दुसरीकडे विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनीही कर्जमाफीची मागणी लावून धरली. उत्तर प्रदेशात कर्जमाफी होते, मग आपल्या राज्यात का नाही असा सवाल करत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला.
उत्तर प्रदेशातल्या कर्जमाफीवरून विरोधक आणि शिवसेनेनं सरकारला जाब विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं. योगींच्या कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास करण्याची सूचना अर्थसचिवांना केल्याचं सांगत विरोधातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.
पाहा काय म्हणाले प्रशांत बंब