अखेर, आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी चैत्यभूमीतील इंदू मिलची 12 एकर जागा अखेर वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत होणार आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी चैत्यभूमीतील इंदू मिलची 12 एकर जागा अखेर वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत होणार आहे.
ऑक्टोबर 2015 ला या स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन झालं होतं. मात्र, भूमीपूजन होऊन दीड वर्ष होत आले तरी जमीन हस्तांतरित होत नव्हती.
अखेर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणींच्या उपस्थितीत विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात जमीनीचं हस्तांतरण राज्य सरकारकडे केलं जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यातील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेही उपस्थित राहणार आहेत.
1400 कोटी रुपये किंमतीच्या या जमिनीच्या बदल्यात राज्य सरकार वस्त्रोद्योग महामंडळाला टीडीआर देणार आहे. या टीडीआरचे हस्तांतरणही शनिवारी राज्य सरकारकडून वस्त्रोद्योग महामंडळाला केलं जाईल.