मुंबई : दुष्काळामुळे प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, म्हणून दुष्काळग्रस्त ग्रामस्थ महानगरी मुंबईची वाट धरत आहेत. मात्र इथेही त्यांची ससेहोलपट थांबली नसल्याचंच दिसून येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाडा, विदर्भातल्या भीषण दुष्काळामुळे हजारो शेतकऱ्यांनी कामाच्या शोधात मुंबई गाठली. नांदेडमधल्या मुखेड तालुक्यातल्या काही दुष्काळग्रस्तांनी पोटाची खळगी भरण्यासाठी, मुलाबाळांसहित अशाच प्रकारे मुंबईची वाट धरली. घाटकोपरमधल्या भटवाडी भागातल्या दत्ताजी साळवी मैदाना बाजूच्या मोकळ्या जागेत, गेल्या काही महिन्यांपासून ते आसऱ्याला आहेत. प्रचंड असुविधा, कामाची हमी नाही अशा स्थितीत ते आला दिवस ढकलत आहेत. 


नांदेडहून आलेले हे दुष्काळग्रस्त महापालिकेच्या ज्या  मोकळ्या पडीक भूखंडावर राहत आहेत, तिथल्या जागेचं माणशी भाडं स्थानिक गुंडांनी ४०० रुपये ठरवलं आहे. स्थानिक गुंड दुष्काळग्रस्तांकडून ही रक्कम राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या नावानं धाकदपटशानं जमा करतात. तर पैसे द्यायला नकार देणा-यांना रात्री ठरवून दगड मारले जातात. येथे आलेल्या दुष्काळग्रस्त महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तो वेगळाच. 


पोटापाण्याची चिंता मिटेल या आशेनं मुंबईत आलेल्या बळीराजाच्या हालअपेष्टांचे दशावतार येथेही संपलेले नाहीत. अशा परिस्थितीत या कणखर कष्टक-यांना अपेक्षा आहे ती सन्मानाच्या वागणुकीची. या असहायांच्या टाळूवरचं लोणी खाणारे गुंड आणि त्यांच्या राजकीय पोशिंद्यांनी याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे.