डॉन दाऊदला आता आफ्रिका अंडरवर्ल्ड गॅंगचा शह
अंमली पदार्थाच्या काळ्या दुनियेवर राज्य करायची ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची गॅंग. पण आता डी कंपनीचं वर्चस्व संपले आहे. साऊथ आफ्रिकेतल्या अंडरवर्ल्ड गॅंगनं या धंद्यात शिरकाव केल्याचं वास्तव समोर आले आहे.
मुंबई : अंमली पदार्थाच्या काळ्या दुनियेवर राज्य करायची ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची गॅंग. पण आता डी कंपनीचं वर्चस्व संपले आहे. साऊथ आफ्रिकेतल्या अंडरवर्ल्ड गॅंगनं या धंद्यात शिरकाव केल्याचं वास्तव समोर आले आहे.
अंमली पदार्थांची तस्करी म्हटली की डोळ्यासमोर येतात ते नायजेरीयन आणि आफ्रिकन नागरिक. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनंच ड्रग्जच्या करोडो रूपयांच्या साम्राज्यावर परदेशातून नियंत्रण ठेवण्यासाठी या आफ्रिकन तस्करांचा वापर केला. पण त्यांनीच आता दाऊदचं ड्रग्ज साम्राज्य काबीज केलंय.
केंद्रीय अंमली पदार्थ तस्कर नियंत्रण कक्षानं रविवारी मुंबई विमानतळावर एका वनिसा डी कोक नावाच्या महिलेला अटक केलीये. या वनिसाकडचा आफ्रिकन पासपोर्ट देखील हस्तगत करण्यात आलाय. वनिसाकडे ४ किलो ९०० ग्रॅम वजनाचं मेथाक्वालोन नावाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे दीड कोटी रूपये आहे. वनिसा अनेकदा अंमली पदार्थ तस्करीसाठी आफ्रिकेवरुन मुंबईत यायची, पण यावेळेस ती जाळ्यात सापडली.
वनिसाच्या चौकशीत जी माहिती मिळाली त्यामुळं एनसीबीला धक्काच बसलाय. मुंबईत आता अंमली पदार्थ तस्करीत साऊथ आफ्रिकेमधील ड्रग माफिया थेट उतरलेत. गेल्या वर्षभरात आफ्रिकेतील अंडरवर्ल्डच्या सहाय्यानं ड्रग माफियांनी मुंबईतील अंमली पदार्थ तस्करी व्यवसाय काबीज केलाय. जवळपास ९९ टक्के तस्करीत आफ्रिकन तस्करांचा सहभाग आढळलाय.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आता थकलाय. त्याची मुंबईवरील पकड कमकुवत झाल्यानंच साऊथ आफ्रिका ड्रग माफियांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं सोप्पं झालं. साऊथ आफ्रिका ड्रग माफिया व साऊथ आफ्रिका अंडरवर्ल्डने मुंबईतील अंमली पदार्थ साम्राज्यावर वर्चस्व मिळवल्याने दाऊद गॅंगचा पारा चढलाय, पण पहिल्या सारखी दाऊद गॅंगची ताकद आता नसल्याने दाऊद गॅंगने मुंबईतील आफ्रिका अंडरवर्ल्डचा सफाया करण्यासाठी एनसीबी आणि पोलिसांना या तस्करांची टीप देण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे आता इंटरनॅशनल अंडरवर्ल्ड वॉरला सुरुवात झाली आहे.