कोपर्डी प्रकरणावरुन विधानसभेत गोंधळ
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्काराप्रकरणी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झालाय.
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्काराप्रकरणी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झालाय.
सकाळी कामकाज सुरू झाल्यावर विरोधीपक्षांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी विधानसभेत निवेदन देऊन चर्चेला स्थगन प्रस्तावाला छेद देण्याचा प्रयत्न केला. त्यावर आक्रमक होऊन अजित पवारांनी सरकार याप्रकरणी संवेदनशील नसल्याचा आरोप केला.
याप्रकरणी सभागृहात निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी कुठलाही मुद्दाच ठेवलेला नाही असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांची चर्चेची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कामकाज स्थगित करून चर्चा घडवण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मात्र स्थगन प्रस्ताव फेटाळाला. यावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजीही केली.