मुंबई : राज्य कर्मचार्‍यांसाठी भाजप-शिवसेना युती सरकारने गुडन्यूज दिलेय. कर्मचाऱ्यांचा आता पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत मिळत आहे. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांना ४५ मिनिटे जास्त काम करावे लागणार आहे. पाच आठवड्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचार्‍यांनाही लवकरच पाच दिवसांचा आठवडा आणि दोन दिवसांची सुट्टी मिळू शकणार आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांची तशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नुकतेच दिलेत.


हा प्रस्ताव मंजूर झाल्यास १९ लाख सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांना रोज ४५ मिनिटे अधिक काम करावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणे सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे पाच दिवस कार्यालयीन कामकाजाचे असावे व शनिवार-रविवार जोडून सुट्टी असावी अशी अनेक वर्षांपासूनची राज्य सरकारी कर्मचार्‍यांची मागणी होती. 


अलिकडेच राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संघटनांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यात कामगारांची मागणी मान्य करण्यात आली होती. राज्य सरकारने गेल्या वर्षी एक समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केलाय. पाच दिवसांचा आठवडा करण्याची शिफारस केली आहे.