सागर कुलकर्णी, मुंबई : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस... गुढी उभारून शुभकार्याला प्रारंभ करण्याचा दिवस... पण, याच सणाच्या निमित्तानं गिरगावात रंगणार आहे जोरदार शक्तीप्रदर्शन... मराठी टक्का काबीज करण्यासाठी शिवसेना विरूद्ध भाजप अशी ही शोभा पाहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरगाव म्हणजे मराठमोळी वस्ती... शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला... पण गेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चीतपट करत इथं भाजपनं विजयाची गुढी उभारली. त्यामुळं गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रांच्या निमित्तानं शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. 


यंदा भाजपनं गुढीपाडव्याच्या निमित्तानं जोरदार पोस्टरबाजी केलीय. नगरसेवक अतुल शहा यांनी पाडव्याचा मुहूर्त साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम गिरगावात आयोजित केलाय. यानिमित्तानं गिरगावकरांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याची ग्वाही भाजप नेत्यांनी दिलीय.


तर दुसरीकडं भाजपच्या खेळीला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी शिवसेनेनं केलीय. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत 'सैराट' फेम आर्ची आणि परश्याला शिवसेना सहभागी करून घेणार आहे. 


गुढीपाडवा म्हणजे साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक... या सणाच्या निमित्तानं तमाम मराठी भाषिक एकत्र येऊन ऐक्याची आणि बंधूभावाची गुढी उभारतात. नेत्यांनी मात्र आपल्या स्वार्थासाठी त्याला राजकीय रंग देण्याची तयारी चालवलीय.