बंदी असताना मुंबईसह राज्यात खुलेआम होतेय गुटखा विक्री
राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटखा उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणली होती. मात्र आज महाराष्ट्रात सहज गुटखा उपलब्ध होत असल्याचं दिसतंय.
मुंबई : राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटखा उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणली होती. मात्र आज महाराष्ट्रात सहज गुटखा उपलब्ध होत असल्याचं दिसतंय.
लोकमान्य टिळक टर्मिनसच्या बाहेर खुले आम गुटखाविक्री होत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे सरकारची गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. पोलीस आणि एफडीए यांचं या प्रकाराकडे दुर्लक्ष होतंय. मुंबई शहरात झोपडपट्ट्या, मोठी रेल्वे स्टेशन्स परिसरात खुलेआम गुटखाविक्री होतेय.
प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून किंवा अर्थपूर्ण व्यवहार करून गुजरात, मध्यप्रदेश इथून गुटखा आणला जातोय. गुटखा विक्रेते माणूस पाहून गुटखा विकत आहेत. राज्यात हा गुटखा कसा येतो. त्याची खुलेआम विक्री कशी केली जाते आणि अशी विक्री होत असतानाही त्यावर कोणाची मेहेरनजर आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे.
टिळकनगर स्टेशन बाहेरून मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांचेही अनेक अधिकारी येत जात असतील. त्यांना ही गुटखा विक्री दिसली नाही का, की अर्थार्जनासाठी त्यांचीही इथे डोळेझाक सुरू आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे.