मी माझ्या वक्तव्यावर ठाम - गायक सोनू निगम
मी कुणाच्याही विरोधात वक्तव्य केलंल नाही, मी धर्मनिरपेक्ष आहे, असं स्पष्टीकरण गायक सोनू निगमने केलं आहे.
मुंबई : मी कुणाच्याही विरोधात वक्तव्य केलंल नाही, मी धर्मनिरपेक्ष आहे, असं स्पष्टीकरण गायक सोनू निगमने केलं आहे. मंदिर आणि मशीदीवर लाऊडस्पीकर वाजवण्याविषयी सोनू निगमने वक्तव्य केलं होतं. सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, एका मौलवीने सोनू निगमचं शीर कलम करण्याचीही धमकी दिली होती, यावर सोनू निगमने उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
लाऊडस्पिकरचा शोध नंतर लागला आहे, आणि त्याचा वापर केला नाही, तर ते धर्माविरोधात आहे, असं म्हणता येणार नाही, असंही सोनू निगमने म्हटलं आहे.
मी कोणत्याही धर्माविरोधात वक्तव्य केलेलं नाही, माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, मंदिर, मशीद असो किंवा गुरूद्वारा यावरील लाऊडस्पीकर वाजवण्याला माझा विरोध आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, ते मांडण्याचा मला अधिकार आहे. या देशात चाललंय तरी काय, का कुणी अशा गोष्टींविरोधात बोलत नाही, असं सवालही सोनू निगमने केला आहे.
माझं शीर कलम करण्याची धमकी तसेच त्यासाठी १० लाख रूपयांचं बक्षिस ही धार्मिक गुंडगिरी नाही का?, मी नास्तिक नाही, पण धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या गोष्टींना माझा विरोध आहे, असं देखील गायक सोनू निगमने म्हटलं आहे.