मुंबई : 'सुट्टे पैसे हवेत, तर माझ्याकडून घ्या' असं पालिकेच्या सभागृहात ओरडून म्हणणाऱ्या भाजपच्या गटनेत्याला हे वाक्य खूपच महागात पडणार असं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचशे, हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद ठरवल्याचा मुद्दा मुंबई महापालिकेच्या सभागृहातही गाजला. जनतेला रांगेत उभे राहूनही सुट्टे पैसे उपलब्ध होत नसल्याचा प्रश्न काँग्रेसने मांडला.


त्यानंतर भाजप गटनेते मनोज कोटक यांनी 'सुट्टे पैसे हवे असतील तर आम्ही उपलब्ध करून देतो' असं वक्तव्य केल्यानंतर 'सामान्य जनतेकडे पैशांची वानवा असताना तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठून?' असा प्रश्न करत काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.


काही काँग्रेस नगरसेवकांनी जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा खिशातून बाहेर काढून सभागृहात फडकावल्या. यानंतर 'सुट्टे पैसे पाहिजे असल्यास माझ्याकडे या' असं आव्हान भाजप गटनेता मनोज कोटक यांनी दिलं.


त्यामुळं आता कोटक यांच्या मुलुंडच्या मेहुल सिनेमागृहासमोर असलेल्या कार्यालय येथे ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जमणार आहेत.


भाजप गटनेते मनोज कोटक यांनी मात्र आपल्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता, असा खुलासा केलाय. तसंच सभागृहात ज्यांनी नोटा फडकावल्या त्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.