अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतून अटक झालेल्या दोन आयएसआय एजंटमुळे भारतातील सर्वात मोठ्या "हवाला सेलचा" पर्दाफाश झालाय. इंडीयन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला हवाला मार्फत पैसे पुरवणा-यांना अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि भारतात जे बॉम्बस्फोट होतात त्यासाठी दहशतवाद्यांना पैसा कुठून मिळतो असा प्रश्न अनेकांना पडतो. महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएस यांनी याच प्रश्नाचं उत्तर शोधत दहशतवादी संघटनांचा कणाच मोडलाय. 


मुंबईतून अटक करण्यात आलेले आयएसआय एजंट जावेद आणि अल्ताफ हे देशात विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामागील हवाला सेल चालवत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. 


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील दहशतवादी विरोधी पथकाचे भायखळा इथल्या कार्यालयाची रेकी आणि पोलिसांवर हल्ला करण्यासाठी कट रचणारा यासिन भटकळ हा एटीएस ऑफिस मागील हबीब मेंशनमध्ये राहिला होता. त्याचवेळी जावेद आणि अल्ताफ यांनीच यासिन भटकळला 13 जुलै 2006च्या रेल्वे साखळी स्फोटासाठी मदत केली होती. 


याचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागलेत. फेब्रुवारी 2007 ते मार्च 2014 पर्यंत देशात झालेल्या प्रमुख बाँम्ब स्फोटांमागे जावेद आणि अल्ताफने आर्थिक पाठबळ दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.



- 2007 साली झालेले दोन बॉम्बस्फोट
- 2008 साली झालेले पाच बॉम्बस्फोट 
- 2010 साली झालेले दोन बॉम्बस्फोट
- 2011 साली मुंबई, दिल्ली इथं झालेले दोन बॉम्बस्फोट
- 2012 साली पुण्यात झालेला बॉम्बस्फोट
- 2013 साली हैदराबाद आणि बंगळुरु इथं झालेले बॉम्बस्फोट
- 2014 साली चेन्नई आणि बंगळुरु इथं झालेले बॉम्बस्फोट



तपास यंत्रणांना आता संशय आहे की जावेद आणि अल्ताफच्या हवाला सेलनेच इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला दहशतवादी कृत्यासाठी पैसे पुरवलेत.


दोराजी, राजकोट, गुजरात इथं 2007 साली पाकिस्तानच्या कराचीहून आलेल्या इक्बाल नावाच्या व्यक्तीनं जावेदची ओळख दानिश नावाच्या एका व्यक्तींशी करुन दिली होती. 


इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचा प्रमुख तसंच मुंबई आणि अहमदाबाद बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दानिश रियाझ हाच तो दानिश असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याच दानिशच्या सांगण्यावरून जावेदने फैजाबाद इथला आयएसआय एजंट आफताबच्या अकाऊंटमध्ये पैसे भरले होते.


मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट करण्यात इंडीयन मुजाहिद्दीनच्या स्लीपर सेलने मोठी भूमिका बजावली होती. अनेकदा पोलिसांनी उद्धवस्त केलेला स्लीपर सेल नव्याने पुन्हा सुरु होण्याचे कारण म्हणजे त्यामागे काम करत असलेलं हवाला सेल. मात्र आता हवाला सेलदेखील उद्धवस्त झाल्याने या हवाला सेलला कोट्यावधी रुपये कोण पुरवत होतं आणि त्याचा मार्ग काय? याचा छडा लावण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करताहेत