मेघा कुचिक, मुंबई : मुंबईत मोकळ्या जागा जवळपास संपल्या असून आता संबंधितांचा डोळा खेळाच्या मैदानांवर पडू लागलाय. 'माटुंगा इंडियन जिमखान्या'लगतचा रस्ता रुंद करण्यासाठी मैदानाचाच लचका तोडण्यात आला असून वृक्षांचीही कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नियमांमध्ये बसवूनच आम्ही करत असल्याचा दावा संबंधित करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील जुन्या जिमखान्यांमधील एक मअसलेला जिमखाना म्हणजे माटुंगा इंडियन जिमखाना... कधी काळी या जिमखान्याच्या मैदानावर 'कांगा लीग'सारखी प्रतिष्ठित स्पर्धा खेळवली जात असे. आता या जिमखान्याला गगनचुंबी इमारतींचा विळखा पडू लागलाय. परिणामी जिमख्यान्याची जागा आणि मैदान आंकुचित केलं जाऊ लागलय. नऊ मीटरपेक्षा कमी अंतर रस्ता असलेल्या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या करता येत नाहीत. यामुळे माटुंगा इंडियन जिमखान्याच्या मैदानाचा 20 फूट भाग गिळंकृत करुन इथले मोठे वृक्षही तोडण्यात आल्याचा आरोप होतोय. वृक्षांची कत्तल करण्यात आल्यानं इथं नव्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र यातील अनेक झाडं ही सुकून गेली आहेत. यामुळे इथंल्या रहिवाश्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.
 
याप्रकरणी संबंधित मुंबई महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, जिमखान्याची जागा जाऊनही जिमखान्यानं याला कोणताही आक्षेप घेतला नसून सहकाऱ्याची भूमिका घेतली आहे. 


उत्तुंग इमारती उभ्या करताना मैदानाची जागा आणि झाडांचा अडथळा येत असल्यानं त्याला नियमांच्या चौकटीत बसवून हा सारा प्रकार इथं सुरु असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे इथले मूळचे रहिवासी, क्रीडापटू आणि पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.