मुंबई : काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच कुटुंबानं दीड लाख रुपयांच्या रेल्वेचं तिकीट बुकींग केलंय. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हे तिकीट बुक करण्यात आल्याचं पुढं आलंय. काळा पैसा पांढरा करण्याच्या उद्देशानं आज रेल्वे आणि विमानाची अनेक तिकीटं आज बूक झाल्याचं लक्षात आलं.


फर्स्ट क्लासचं आरक्षण थांबवलं


लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचं एसी फर्स्ट क्लासचं आरक्षण पश्चिम रेल्वेनं थांबवलं आहे. त्यानुसार १३ नोव्हेंबरनंतरच्या एसी फर्स्ट क्लासचं आरक्षण, प्रवाशांना उद्यापर्यंत थांबवण्यात आलं आहे. एसी फर्स्ट क्लासच्या आरक्षणात २० टक्क्यांपेक्षा जास्त बुकिंग झाल्याचं पश्चिम रेल्वेच्या लक्षात आलं. 


पाचशे, हजाराच्या नोटा बंदीचा निर्णय येण्याआधी ८ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत, पश्चिम रेल्वेवर ८० लाखांचं तिकीट आरक्षण केलं गेलं होतं. मात्र, बंदी आल्यानंतर ९ नोव्हेंबरला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तब्बल १ कोटी ८० लाखांचं आरक्षण केलं गेलं. काळा पैसा लपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वेचं आरक्षण केलं गेलं होतं. त्यावर पश्चिम रेल्वेनं तात्काळ हा निर्णय घेतला.


त्याचवेळी ५० हजारांपेक्षा जास्त रकमेच्या तिकिटांचं रेल्वे प्रवासाचं आरक्षण करायचं असेल किंवा ते रद्द करायचं असेल, तर पॅन कार्ड दाखवणं प्रवाशांना बंधनकारक करण्यात आलंय. दरम्यान पाचशे आणि हजारच्या नोटा हद्दपार होत असल्यामुळे, पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अनेक प्रवाशांनी फर्स्ट क्लासचे वार्षिक पास काढून घेतल्याचं दिसून आलं.