मुंबई : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती आता पूर्ण होऊ शकते. कारण, मुंबई तसेच देशातील शेवटच्या डीसी विद्युतप्रणालीवर धावणाऱ्या ट्रेनची सफर करण्याची संधी तुम्हाला शनिवारी रात्री मध्य रेल्वे मार्गावर मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील शेवटची ९ डब्यांची डीसी ट्रेन कुर्ला ते सीएसटी दरम्यान शनिवारी रात्री ११:३० ते १२:४५ या वेळात धावणार आहे. पण, या इतिहासाचा एक भाग होण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी मोठी किंमत द्यावी लागणार आहे. या ट्रेनच्या शेवटच्या सफरीचे तिकीट तब्बल १०,००० रुपयांना विकले जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या शेवटच्या ट्रेनची केवळ ३०० तिकीटं विकली जाणार आहेत.   


हे तिकीट काढणाऱ्या व्यक्तींना सीएसटीच्या विशेष कक्षात बसून रात्री केले जाणारे मध्य रेल्वेचे डीसी ते एसी परिवर्तनही लाईव्ह पाहता येणार आहे. केवळ मुंबईतच नव्हे, तर डीसी प्रवाहावर चालणारी ही देशातील शेवटची ट्रेन असणार आहे.


३ फेब्रुवारी १९२५ साली पहिल्यांदा मुंबईत डीसी ट्रेन्स सुरू झाल्या होत्या. मुंबईच्या इतिहासात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. पण, तंत्रज्ञानाचा जसा विकास झाला तसा जास्त २५,००० व्होल्टेजच्या ट्रेन देशभरात आणल्या गेल्या. मुंबईची हार्बर सेवा मात्र यापासून वंचित राहिली. आता ती सेवाही कात टाकणार आहे.


या तिकीटांमधून वसूल केलेली रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिली जाणार आहे. पण, काही प्रवासी संघटना मात्र या महागड्या तिकीटांमुळे नाराज झाल्या आहेत.