मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी झाली. पुण्यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने विजय संपादन केला तरी सांगलीत जास्त मते असूनही राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. येथे काँग्रेसने बाजी मारली. तर नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा जपली. येथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा – सांगली विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे मोहनराव कदम 64 मतांनी विजयी झालेत. या ठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती. शेखर माने यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे काँग्रेसला धोका होता. तसेच राष्ट्रवादीचे मतदार जास्त होते, असे असताना राष्ट्रवादीचे शेखर गोरे पराभूत झालेत. या ठिकाणी जयंत पाटील यांना जोरदार धक्का बसला  आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात पराभव झाल्याने नाचक्की झालेय.


यवतमाळमधून विधान परिषदेवर शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले. तानाजी सावंत यांना 348 मते मिळालीत. तर पुणे विधान परिषदेच्या जागेचा निकाल राष्ट्रवादीच्या बाजुने लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले विजयी झालेत. 


तर जळगाव विधान परिषद निवडणुकीत दुस-या फेरीत भाजपाचे उमेदवार चंदूलाल पटेल यांना 90 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार अॅड. विजय पाटील यांना 7 मते पडलीत. या ठिकाणी भाजपने आपला विजय निश्चित केला. पटेल यांना विजयी घोषीत करण्यात आले.


भंडारा गोंदियामधून भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे.  भाजपचे परिणय फुके यांनी चांगलीच आघाडी घेतली. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना धक्का बसल्याचे चित्र आहे. काँग्रेस – प्रफुल्ल अग्रवाल,  राष्ट्रवादी – राजेंद्र जैन हे उमेदवार रिंगणात होते.