मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 नोव्हेंबर 2016 रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मुदत मार्च 2016 पूर्वी मुदत संपत आहे. तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील. 


2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी 9 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक विभागांमध्ये, तर पंचायत समिती क्षेत्राची निर्वाचक गणांमध्ये विभागणी म्हणजे प्रभाग रचना करतील व त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करतील, असे ते म्हणालेत.


मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षण


या प्रस्तावात अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाचाही समावेश असेल. विभागीय आयुक्त त्यास 23 सप्टेंबर 2016 पर्यंत मान्यता देतील. 5 ऑक्‍टोबर 2016  रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षणाबाबतची जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठीची सोडत जिल्हाधिकारी; तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठीची सोडत तहसीलदारांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.


निवडणूक विभाग आणि निर्वाचक गण


आरक्षणाबाबतचे प्रारूप 10 ऑक्‍टोबर 2016 रोजी प्रसिद्ध केले जाईल. नागरिकांना 10 ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे हरकती व सूचना त्यावर दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर संबंधित विभागीय आयुक्त सुनावणी देतील. त्यानंतर ते 17 नोव्हेंबर 2016 पर्यंत निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची रचना अंतिम करतील. त्यास 25 नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्धी दिली जाणार आहे.


या आहेत जिल्हा परिषदा आणि पंचाय समिती विभाग


रायगड- 61, रत्नागिरी- 55, सिंधुदुर्ग- 50, नाशिक- 73, जळगाव- 67, अहमदनगर- 73, पुणे- 75, सातारा- 64, सांगली- 60, सोलापूर- 68, कोल्हापूर- 67, औरंगाबाद- 62, जालना- 56, परभणी- 54, हिंगोली- 52, बीड- 60, नांदेड- 64, उस्मानाबाद- 55, लातूर- 58, अमरावती- 59, बुलढाणा- 60, यवतमाळ- 61, नागपूर- 58, वर्धा- 52, चंद्रपूर- 56 आणि गडचिरोली- 51.