मुंबई : राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाला राज्याचा भूगोल किंवा नकाशे दाखवण्याची गरज आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने मागील काही महिन्यात अनेक चुका केल्या आहेत, या चुकांकडे तत्कालीन राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधींनीही डोळेझाक केली आहे. म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाला यांचे गांभीर्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या कवी केशवसुत यांच्या गावी पुस्तकांचे गाव उभारण्याची सरकारची योजना आहे. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात असतानाही मराठी राजभाषा दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीत मालगुंड हे गाव सातारा जिल्ह्यात असल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे सरकारच्याच माहिती व जनसंपर्क विभागाला राज्याचा भूगोल माहीत नाही का? हा प्रश्न उभा ठाकला आहे.


मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने काही वृत्तपत्रात मोठी जाहिरात दिली आहे. यात समृद्ध आणि प्रतिभासंपन्न मराठी भाषेसाठी सरकारच्या योजनांविषयी माहिती देण्यात आली आहे. 


माहिती व जनसंपर्क संचालनालयाने प्रसिद्धीस दिलेल्या या जाहिरातीत सातारा जिल्ह्यातील मालगुंड या गावाला पुस्तकांचे गाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 


मात्र प्रत्यक्षात हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळेजवळ आहे. केशवसुत हे मराठीतील नामवंत साहित्यिक होते. त्यांच्या मालगुंड या गावी त्यांचे स्मारकही आहे. त्याच गावी पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे. मात्र, हे गाव सरकारच्या जनसंपर्क विभागाला नक्की कुठे आहे, हे माहीतच नाही.