मुंबई : छगन भुजबळ हे निर्दोष आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीररित्या लढा देईल, असे मत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेय. भुजबळ यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधारी पक्षाचे खासदार, मी आणि मुख्यमंत्री यांनी भुजबळ प्रकरणावर जातीने काम केल्याचे सांगतात. याचा अर्थ नक्की काय समजायचा? ज्या पद्धतीने वृत्तवाहिन्यांवर भाजपचे प्रवक्ते बोलत आहेत, त्यावरुन भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे स्पष्टपणे दिसतेय, असा आरोप पवार यांनी केलाय.


निर्णय एकट्या भुजबळांचे नाहीत!


महाराष्ट्र सदनाबाबतचे सर्व निर्णय एकट्या भुजबळांचे नव्हते. सर्व मंत्रिमंडळाचा या निर्णयप्रक्रियेत समावेश होता. कोणीही जर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची इमारत पाहिली तर त्याचे बांधकाम चांगल्या दर्जाचे असल्याचे लक्षात येईल, असेही पवारांनी सांगितले.


राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे भुजबळ यांच्या पाठीशी आहे. आम्ही त्यांच्यासाठी कायदेशीर लढा लढू असे पवारांनी म्हटलेय. महाराष्ट्र सदन तसेच इतर ११ प्रकरणांच्या घोटाळ्यातून तब्बल ८७० कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आहे.



भुजबळ यांची ११ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली महासंचालनालयाने ब्लॅक मनी प्रतिबंधक कायद्यान्वये काल रात्री अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना धीराचा सल्ला देण्यात आला होता. भुजबळ यांच्या अटेकवरून कोणत्याही प्रकारची आंदोलने करू नका, असे पवार आवाहन केलेय.