`विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन`
विधानसभेत बहुमत असावे यासाठी विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. तर निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला.
मुंबई : विधानसभेत बहुमत असावे यासाठी विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. तर निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला.
विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. शनिवारी अर्थसंकल्प मांडताना अडथळा आणणं, तसंच सभागृहाचा अवमान करणं, या कारणांवरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत या सर्वांचं निलंबन केलं गेले आहे.
अजित पवार यांच्यावेळी घातलेला गोंधळ हा तेव्हा विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफी वर घातलेला नव्हता. तर तेव्हा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष पद मिळावे या कारणाने घातला होता. सभेत बहुमत असावे यासाठी असा निर्णय सत्ताधारी यांनी घेतला आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केलाय.
विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षांचे आमदार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यासाठी गेले. जोपर्यंत निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार, विरोधकांनी केलाय. तसंच कारवाईचा निषेध करत विधान परिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यानंतर दिवसभरासाठी विधान परिषदेचं कामकाज तहकूब केलं गेलं.
विरोधी पक्षांच्या आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सरकारवर टीका केलीय. हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप, विखे पाटील यांनी केलाय. तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही या कारवाईचा निषेध केलाय.
लोकशाहीला मारक भूमिका सरकार घेत आहे.
फडवणीस सरकार अल्प मतात येईल की काय म्हणून हे निलंबन करत विरोधकाचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवरी आमदार निलंबन प्रकारावर टीका केली आहे.