मशीद बंदर स्टेशनजवळील आगीतून ठळक गोष्ट समोर
मुंबईत मध्य रेल्वेवरच्या मशीद बंदर स्थानकालगत काल संध्याकाळी मोठी आग लागली. त्यात 36 झोपड्या जळून भस्मसात झाल्या. रेल्वे ट्रॅक लगत काही अंतरापर्यंत बांधकाम असू नये याची आवश्यकता, या दुर्घटनेतून ठळकपणे समोर आली.
अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेवरच्या मशीद बंदर स्थानकालगत काल संध्याकाळी मोठी आग लागली. त्यात 36 झोपड्या जळून भस्मसात झाल्या. रेल्वे ट्रॅक लगत काही अंतरापर्यंत बांधकाम असू नये याची आवश्यकता, या दुर्घटनेतून ठळकपणे समोर आली.
आपलं नेमकं किती नुकसान झालंय हे सांगतानाचं दुःख, यासमिनच्या चेह-यावर स्पष्ट दिसतंय. पालिका शाळेत शिकणारी यासमिन राखेच्या ढिगा-यातल्या आपल्या घरात, शोधाशोध करतेय. त्यातच सापडलेलं शाळेचे दप्तर उचलून तिनं ते आपल्या मैत्रिणीच्या घरी सुरक्षित ठेवलं. बाकी मात्र सगळंच राखरांगोळी झालंय.
दोन मजली घरांच्या पत्र्यांवर उभं राहून काही मुलं पतंग उडवत होते. अचानक पतंग रेल्वेच्या उच्चदाबाच्या विजेच्या तारेला चिकटली आणि भडका उडाला. त्यात ती सगळी मुलं जखमी झाली. शिवाय आगीच्या ज्वाळांनी झाडूच्या ढिगा-याला वेढलं. आणि बघताबघता आगीत तिथल्या ३६ झोपड्या जळून भस्मसात झाल्या.
मुलांच्या छोट्याशा चुकीमुळे ३६ घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रेल्वेरुळा लगतच या झोपड्या असल्यानं, आगीची झळ रेल्वे ट्रॅकला बसण्याचीही दाट भीती होती. म्हणून खबरदारीकरता आग विझेपर्यंत ट्रॅक लोकल सेवेकरता बंद ठेवला गेला. मात्र रेल्वे ट्रॅकपासून ५०० मीटर अंतरापर्यंत कोणतंही बांधकाम नसावं ही अट किती आवश्यक आहे, याची प्रचिती यातून आली.