मुंबई : गिरगाव चौपाटीवर झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात लागलेली आग हा एक अपघातच होता. या घटनेकडे अपघात म्हणूनच बघितलं पाहिजे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. पण महाराष्ट्र रजनी सेटला जी आग लागली ती तेवढीच गंभीर होती. कलाकार, सर्वसामान्य व्यक्ती, व्हीआयपी यांच्या जीविताला धोका होता असं मत न्यायालयाने नोंदवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा कार्यक्रमांचं नियोजन करताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते. तशी काही पॉ़लिसी आहे का, काही नियम अटी आहेत का अशी विचारणा न्यायालयाने केलीय. यासंबंधी दोन आठवड्यात माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. 


महाराष्ट्र संगीत रजनी कार्यक्रमात आग लागली. अशा घटना भविष्यात घडू नये आणि कलाकारांना योग्य ती सुरक्षा मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर न्यायालयात आज तातडीने सुनावणी झाली. एडींग फॉर जस्टीस या संघटनेने ही जनहित याचिका दाखल केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखणे गरजेचे आहे. प्रामुख्याने कलाकारांना आवश्यक  सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.


कलाकारांचे सादरीकरण असलेल्या कार्यक्रमाची आणि स्टेजची संपूर्ण माहिती प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्यांना आणि कलाकारांना दिली पाहिजे. आपतकालीन परिस्थिती ओढावल्यास कोठून बाहेर पडावे याची माहिती त्यांना द्यायला हवी. स्टेजजवळ पुरेसे अग्निरोधक यंत्र ठेवावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने यावर बुधवारी सुनावणी होईल, असे जाहीर केले. 


दरम्यान, या घडनेला जी कंपनी व्यवस्थापन पाहात होती, तीच जबादार आहे, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय.