मुंबई : राष्ट्रवादीने आश्वासन दिल्याप्रमाणे आपला शब्द पाळत काँग्रेसच्या पदरात विधान परिषदेच्या उपसभापतीपद टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची उपसभापदी निवड बिनविरोध करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आज काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांची निवड करण्यात आली. भाजपच्या भाई गिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. एकूण ७८ सदस्यीय विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २७ तर काँग्रेसचे १९ सदस्य आहेत. 


दोन्ही पक्ष एकत्र राहिल्यास काँग्रेसचे मणिकराव ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण भाजपचे भाई गिरकर यांनी गुरुवारी अर्ज भरल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच भाजपने राष्ट्रवादीचा हवाला देऊन दावा केला. त्यामुळे काँग्रेसपुढे पेच होता. मात्र, राष्ट्रवादीने आपला आघाडीचा धर्म पाळला आणि काँग्रेसला उपसभापती पद मिळवून दिले.


दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागांवर पाठिंबा देण्याच्या बदल्यात काँग्रेसला उपसभापतीपद देण्याचे राष्ट्रवादीने मान्य केले होते, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर शुक्रवारी भाई गिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने माणिकराव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. १९९९ ते २००३ या काळात ठाकरे यांनी राज्यमंत्रिपद भूषविले होते. त्यानंतर तब्बल १३ वर्षांने त्यांना लाल दिव्याची गाडी मिळणार आहे.