मुंबई : मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन मुंबईत राजकारण सुरू असले तरी मराठीची मुंबईतील अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत मागील 20 वर्ष शिवसेना सत्तेत आहे, मात्र या कालावधीत मुंबई महापालिकेतील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. मागील चार वर्षात मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या 21 हजार घसरल्याची आकडेवारी 'झी मीडिया'ला उपलब्ध झाली आहे.
 
मागील पन्नास वर्ष शिवसेना मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राजकारण करत आहे, तर याच शिवसेनेची मागील 20 वर्ष मुंबईत सत्ता आहे. मात्र, राज्याची राजधानी असलेल्या या मुंबईतील मराठीकडे दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा...


माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार मागील चार वर्षात मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूया..


मुंबई महापालिकेतील मराठी शाळांची स्थिती


- 2012-13 साली 385 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 81 हजार 216 विद्यार्थी शिक्षण घेत होते


- 2014-15 साली 351 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 59802 विद्यार्थी शिक्षण घेत होते.


म्हणजेच मागील चार वर्षात मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या 34 ने कमी झाली आणि विद्यार्थ्यांची संख्या 21414 ने कमी झाली आहे.


खाजगी शाळांची स्थिती सारखीच...


मुंबईतील केवळ महापालिका शाळांमधली ही अवस्था नाही तर खाजगी मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही हेच चित्र आहे. मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी महापालिकेच्या मराठी शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्यामुळेच विद्यार्थी आता महापालिका शाळेकडे वळताना दिसत नाहीत.


मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या घोषणा दिल्या जात आहेत. शिवसेनेनेही आपल्या वचननाम्यात मुंबई महापालिकेत शिक्षण घेणाऱ्यांना नोकरीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे मुंबईत केवळ मराठी अस्मितेचे राजकारणच सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.