मुंबई : दादर शिवसेना भवनासमोर असलेली जुनी कोहिनूर मिलची भिंत अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. ही भिंत सध्यातरी अनधिकृतरित्या शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहे. त्यावर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या जाहिराती रेखाटल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी रात्री मात्र भाजप कार्यकर्त्यांनी अचानक या भिंतीवर आपला कब्जा केला. मनसेच्या हिस्स्याच्या भिंतीवर भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौ-याची जाहिरात रेखाटली आणि त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचं पित्त खवळलं. शुक्रवारी सकाळी या जाहिरातीवर पुन्हा पांढरा रंग फासत मनसेनं आपला संताप व्यक्त केला.


याआधी दादर माहिमवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना मनसेमधे संघर्ष होत असे. गेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपला मतदारांकडून इथं चांगला प्रतिसाद मिळाल्यानं सध्या  कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. त्यामुळे थेट मनसेला न जुमानता भिंतीवर थेट कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या भिंतीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं शिवाजी पार्क पोलिस ठाणं सावध होतं. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं भाजप-मनसे कार्यकर्त्यांमधला पुढचा अनर्थ टळला. नाहीतर भिंतीवर ताबा कुणाचा यावरुन तरी कार्यकर्त्यांनी ऐकमेकांची डोकी नक्कीच फोडली असती.