दिनेश दुखंडे, मुंबई : मनसेच्या आजच्या चिंतन बैठकीत राज ठाकरे आणि सरचिटणीस पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पक्षाची ठोस भूमिका नसल्याने भूमिका मांडण्यात अडचणी येतात असाच सूर नेते मंडळीनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे विरुद्ध नेते, सरचिटणीस अशी जबरदस्त खडाजंगी झाली. पदाधिकारी बैठकीत 36 मतदारसंघातील अहवाल सादर केला. यावेळी पक्षवाढीबाबत आणि माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडत असल्याचा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यावेळी नेते आणि सरचिटणीस यांनी यावर नापसंती व्यक्त केली.


पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी खंडाजगी झाली. नेते, सरचिटणीस यांनी राज ठाकरे यांना पराभवाबाबत परखड मते सुनावलीत. तर राज ठाकरे यांनी नेत्यांना त्यांच्या कामगिरीबाबत कानपिचक्या दिल्या आहेत. राज ठाकरे आणि नेते सरचिटणीस यांनी एकमेकांवर पराभवाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला.


खंडाजगीचे काही मुद्दे :


मनसे नेते आणि सरचिटणीस यांनी राज ठाकरे यांना उद्देशून सांगितले, विविध विषयांवर तुमच्याकडून पक्षाच्या भूमिकाच येत नाहीत. त्यावेळी राज ठाकरे यांनी तुम्ही माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडत आहात, असे बजावले.


त्याचवेळी नेते आणि सरचिटणीस यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांची मागणी आहे, आता आपण अन्य भाषिकांनाही जवळ केले पाहिजे. मात्र, राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर कायम राहिले. त्यांनी स्पष्ट शब्दात नेत्यांना सुनावले, मी मराठीचा मुद्दा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते दिली नाही तरी चालतील.