`ऐ दिल है मुश्किल`ला विरोध करणाऱ्या मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना अटक
करण जोहरचा `एे दिल है मुश्किल` हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.
मुंबई : करण जोहरचा 'एे दिल है मुश्किल' हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवत सीएसटीजवळील मेट्रो सिनेमागृहाबाहेर आंदोलन केले. यावेळी मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.
आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झालीय. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काल चित्रपटाचा निर्माता करण जोहर यानं यापुढे पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नाही, पण सध्याचा ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ द्या, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत विरोध कायम ठेवण्याचा निर्णय झाला.
दरम्यान आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमाच्या मालकांना हा चित्रपट रिलीज करून नका असा आवाहन वजा इशारा दिला होता. त्यानंतर 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित करू नये, या मागणीसाठी आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमागृहाबाहेर आंदोलन केले. आझाद मैदान पोलिसांनी १२ कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.