मुंबई : 500 आणि 1000 नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला खरा. मात्र, याचा सर्वाधिक त्रास हा सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. नोटा बदलण्यासाठी वेळ दिला पाहिजे होता. तसे झालेले नाही. धनाढ्य बॅंक किंवा एटीएमच्या रांगेत दिसत नाही. त्यामुळे मोदींना सर्वसामान्य जनतेचा 'सर्जिकल स्ट्राइक' भारी पडेल, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप मित्रपक्ष शिवसेनेने मोदी सरकारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली. अशाप्रकारे अचानक नोटा रद्द करणं चुकीचं असल्याचं यावेळी उद्धव म्हणाले. नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे ज्यांनी निवडून दिलं त्यांना त्रास होत आहे. टोल फ्री केला तसेच वैद्यकीय उपचार फ्री करा, नोटा रद्द करण्याला आमचा विरोध नाही, पण सामान्यांना त्रास होता कामा नये, अशीच आमची अपेक्षा आहे, उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. सामान्य लोकांचा घामाचा पैसा आहे. तो काळा पैसा नाही, आम्ही काळ्या पैशाविरोधात आहोत. मात्र, काहीतरी वेळ द्यायला हवा होता, असे ते म्हणालेत.


धन की बात करणारे मोदी सामान्य लोकांच्या मन की बात विसरलेत. आज उन्हात धनाढ्य नव्हे तर सामान्य लोकांच्या बॅंक, एटीएमसमोर रांगा दिसत आहेत. आमचा शिवसैनिक त्यांच्यासाठी आपल्या परीने मदत करीत आहेत. लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते. तसे झालेले नाही. नरेंद्र मोदींनी सामान्य जनतेला त्रास दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता जो सर्जिकल स्ट्राइक करेल तो या सरकारला भारी पडेल, अशा इशारा उद्धव यांनी यावेळी दिला.