मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. विधानसभा निवडणुकांवेळी युती तुटल्यानंतर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली. यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेना-भाजपची युती झाली नाही, पण 2017 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांची युती होणार असल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि जनमानसात भाजपची होत असलेली प्रतिमा पाहता मुख्यमंत्री शिवसेनेबरोबर युती करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याची माहिती डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे. 


देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणूकपूर्व युतीबाबत चर्चा झाल्याचं भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितल्याची डीएनएनं बातमी दिली आहे. 


मुख्यमंत्री युतीबाबत सकारात्मक असले तरी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना मात्र महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची असल्याचंही या भाजप नेत्याचं म्हणणं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये भाजपला मजबूत बनवण्यासाठी मोदी-शहांना युती नको असल्याचंही या नेत्यानं सांगितलं आहे. 


युतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असले तरी शिवसेना मात्र सगळ्या 227 जागांवर लढण्याची तयारी करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिली आहे.