कृष्णात पाटील, झी मिडिया मुंबई : ठाणे महापालिकेनं फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरु केल्यानंतर आता मुंबईतही काही ठिकाणी बीएमसी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत आहे. नेहमीप्रमाणे मुंबईतील ही कारवाईदेखील फार्सच ठरण्याची शक्यता अधिक आहे. परंतु याला अपवाद आहे पालिकेचा बी वॉर्ड.  बी विभागाला जे जमतं ते इतर विभागांना का जमत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंगरी परिसरातील हे सँडहर्स्ट रोड स्टेशन. मुंबईतील हे एकमेव स्टेशन फेरिवालामुक्त असल्याचा दावा मुंबई महापालिकेचा बी वॉर्ड करतो. पाहायला गेलं तर याठिकाणी एकही फेरीवाला दिसत नाही. रेल्वे स्टेशनमध्ये जाणा-या येणा-या प्रवाशांना कुठलाही त्रास होत नाही. स्टेशनच्या आसपासचा परिसरही फेरीवाले नसल्यानं एकदम मोकळा असलेला दिसून येतो. 


अनधिकृत लायसनधारकांच्या दोनचार टप-या सोडल्या तर फेरीवाल्याचे अस्तित्व या परिसरात जाणवत नाही.  पालिकेच्या कार्यालयीन वेळेत फेरीवाले दिसत नसले तरी इतरवेळी काही फेरीवाले दुकाने थाटत असल्याचे स्थानिकांचे मत आहे. परंतु बी विभागाचे अधिकारी फेरीवाल्यांविरोधात करत असलेल्या कारवाईमध्ये सातत्य असून यामुळं फेरीवाल्यांची संख्याही कमी झाल्याचे स्थानिक सांगतायत.


फेरीवाल्यांच्या विरोधात सर्वाधिक कारवाई ही डोंगरी परिसरात म्हणजे बी विभागात होते. वारंवार केल्या जात असलेल्या कारवाईचा धसका फेरीवाल्यांनी घेतला आहे. तरीही काही फेरीवाले कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त दुकाने लावत असली तरी पुढील काळात त्यांच्याही बंदोबस्त करणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.


मुंबईत सर्वत्रच फेरीवाल्यांविरोधात कधी कधी कारवाई केली जातंय. पण तो असतो केवळ फार्स. या कारवाईमध्ये सातत्य नसते. पालिकेच्या बी विभागाने मात्र या कारवाईत सातत्य राखून फेरीवाल्यांवर वचक ठेवला आहे. अशाच प्रकारचा वचक मुंबईत सर्वत्र फेरीवाल्यांवर निर्माण झाल्य़ास मुंबईकरांना अनेक रस्ते चालण्यासाठी मोकळे होतील.