मोदींच्या भेटीनंतर सीएम गप्पच, भाजपमध्ये प्रचंड असवस्थता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्री माघारी आले तरी ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असवस्थता आहे.
मुंबई : राज्यात 10 महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीत भाजने चांगले यश मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्री माघारी आले तरी ते काहीही बोलले नाहीत. तसेच महापौर निवडणुकीबाबत काहीही बोलत नसल्याने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असवस्थता आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना काय संदेश दिलाय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 24 तासानंतरही मुख्यमंत्री यांच्याकडून काहीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे राज्यातील खास करून मुंबईतील नेते, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
मुख्यमंत्री यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत बंद दरवाज्याआड़ सुमारे दीड तास चर्चा केली. मुख्यमंत्री दिल्लीहुन संध्याकाळी परतले तेव्हा काही घडामोडी होतील, अशी अटकळ सर्वजण बांधत होते. मात्र 24 तासानंतरही काहीही हालचाल होत नसल्याने, कोंडी फूटत नसल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीहुन नेमका कोणता आदेश घेऊन आले आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने कोकण भवनात जाऊन गट नोंदणी सोपस्कार पूर्ण केला असतांना भाजपाने मात्र काहीही हालचाल केलेली नाही.
कोंडी फुटावी यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन कोणतीच हालचाल दिसत नसल्याने मुंबई भाजपमध्ये अस्वस्थता आहे. मुंबईच्या निर्णयावर राज्यातील युतीचा निकाल लागला जाणार आहे. चांगला विजय मिळवलेले, सत्ता समोर असलेले राज्यातील भाजप नेते , कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठी असवस्थता आहे.